मनसेसोबतची युती शिवसेनेसाठी घातक – उद्धव ठाकरेंना किशोर तिवारींचे उघड पत्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करू नये, अशी मागणी माजी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.
तिवारींनी ठाकरे यांना उघड पत्र लिहून, मनसेसोबतची युती ही शिवसेनेसाठी घातक ठरेल, असा इशारा दिला आहे.
पत्रात तिवारींनी नमूद केले आहे की, राज ठाकरे यांनी अनेक वर्षे भाषावाद आणि प्रांतवादाच्या माध्यमातून हिंदी भाषिक, मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने हल्ले केले आहेत.
त्यामुळे मुंबईसह राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातला अल्पसंख्यांक व हिंदी भाषिक मतदार वर्ग शिवसेना-मनसे युतीविरोधात जाण्याची शक्यता आहे.
“महाविकास आघाडी व इंडिया ब्लॉकला साथ देणारा हा महत्त्वाचा मतदार वर्ग जर दुरावला, तर भाजपाला थेट फायदा होईल.
गेल्या निवडणुकांत शिवसेनेला विजय मिळवून देण्यात याच मतदारांचा
मोलाचा वाटा होता. पण, मनसेसोबत युती केल्यास शिवसेना सैनिकांतही नाराजी वाढेल,” असे तिवारींनी सावध केले आहे.
परप्रांतियांना बेदम मारहाण, अजाण प्रकरणावर धमक्या
किशोर तिवारींनी मनसेच्या आक्रमक भूमिकेवरही टीका केली आहे.
मराठी बोलत नसल्यामुळे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातील व्यवसायिकांना बेदम मारहाण केल्याची उदाहरणे त्यांनी मांडली.
लाऊडस्पीकरवरील अजाणच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाला धमक्या दिल्या गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
“शांतताप्रिय महाराष्ट्रात दहशत निर्माण करणाऱ्या मनसेसोबत युती करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे,” असे तिवारींनी ठामपणे म्हटले आहे.
किशोर तिवारींची ठाम भूमिका
किशोर तिवारी हे शेतकरी, आदिवासी आणि दलितांसाठी झटणारे कार्यकर्ते असून, ते गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना शिवसेनेने प्रवक्तेपद दिले होते; मात्र
त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले.
आता त्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत, मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांना सावध केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यांच्या या सल्ल्याकडे कसा प्रतिसाद देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.