खासदार अमर काळेंनी मंचावरच व्यक्त केली नाराजी

खासदार अमर काळेंनी मंचावरच व्यक्त केली नाराजी

वर्धा : नगर परिषद लोकार्पण सोहळ्यात प्रोटोकॉल वाद; खासदार अमर काळेंनी मंचावरच व्यक्त केली नाराजी

वर्धा : हिंगणघाट नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात प्रोटोकॉल वाद उफाळला.

या सोहळ्याच्या पत्रिकेत खासदार अमर काळे यांचे नाव प्रोटोकॉलनुसार छापण्यात न आल्याने त्यांनी मंचावरूनच नाराजी व्यक्त केली.

स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) पार पडलेल्या या कार्यक्रमात खासदार काळेंनी भाषणादरम्यानच मुख्याधिकाऱ्यांना थेट माईकवर जाब विचारला.

यावेळी अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे हा प्रोटोकॉल राजकीय दबावाखाली चुकविण्यात आल्याचा आरोप यावेळी झाला.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये खासदार अमर काळे यांना डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) करत आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगणघाट येथील कार्यक्रमातील प्रोटोकॉलची चूक ही राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा सवाल उपस्थित केला जातो आहे.


केळझर : शासकीय विश्रामगृह बनले अवैध धंद्याचे केंद्र

वर्ध्याच्या केळझर येथील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह दुरावस्थेत असून सात वर्षांपासून ते अवैध धंद्यांचा अड्डा बनल्याचे उघड झाले आहे.

या विश्रामगृहावर शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला, मात्र चारही इमारती मोडकळीस आल्या आहेत.

खिडक्या, दरवाजे, टाईल्स चोरीला गेल्या असून, पर्यटक व अधिकारी येणं बंद झालं आहे.

पर्यटनस्थळ असलेल्या केळझरमध्ये ही वास्तू अव्यवस्थित व नादुरुस्त अवस्थेत असल्याने शासनाचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे.


यवतमाळ : ट्रकसह 25 टन सोयाबीन जळून खाक

यवतमाळ : मारेगावजवळील बोटोणी गावाजवळ सोयाबीनने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह सुमारे 25 टन सोयाबीन जळून खाक झाले.

ही घटना घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली. करंजी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून गेला.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/savara-yehetha-pach-maji-sainik-hospital-samarmb/