शहरातील वाहतुकीत शिस्त आणा – जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक; १६ ऑगस्टपासून तपासणी मोहीम सुरू
अकोला, दि. १४ : शहरातील बेशिस्त वाहतूक सर्वांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करते.
त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना कायद्याची भीती दाखवून वाहतुकीत शिस्त आणावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगितले की, वाहनचालक व ऑटोचालकांकडून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, शाळकरी मुलांना रिक्षात गच्च भरून नेणे यामुळे वाहतूक व सुरक्षितता धोक्यात येते.
या बाबतीत शाळा, चालक संघटना व पालकांमध्ये जागृती करावी. लक्झरी बस कुठेही उभ्या करण्याच्या प्रकारावरही नियंत्रण आणावे. नियमभंग करणाऱ्यांवर प्रसंगी परवाना रद्द करण्याची कारवाई करावी.
चुकीच्या दिशेने उड्डाणपुलावर प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच अपघात टाळण्यासाठी पुलांवर स्पाईक गार्ड बसवावेत, अपघातप्रवण ठिकाणी फलक,
रिफ्लेक्टर्स, रंबलर्स बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयासमोर गतिरोधक व फुटपाथची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा व इतर सार्वजनिक वाहनांची कडक तपासणी करण्यासाठी १६ ऑगस्टपासून आरटीओ व पोलीस
विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ भुयार यांनी दिली.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/akotamadhyaye-gargapatachaya-goyanchi-illegal-sales/
