मानवी हक्कांचा मुद्दा; अमेरिकेचा भारतावर आरोप, पाकिस्तानला खुला पाठिंबा
वॉशिंग्टन/नवी दिल्ली – भारत-अमेरिका संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण करणारा अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल मंगळवारी जाहीर झाला असून, यात भारतावर मानवी हक्क उल्लंघनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मोदी सरकारने अशा प्रकरणांत ठोस आणि विश्वासार्ह पावले उचलली नाहीत, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या घडामोडींकडे अमेरिकेची मोदी सरकारविरोधातील नवी दबावनीती म्हणून पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, या अहवालात पाकिस्तानविषयीही असाच उल्लेख असून, तेथील सरकारनेही क्वचितच प्रभावी कारवाई केल्याचे नमूद केले आहे.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत ट्रम्प प्रशासन पाकिस्तानसोबतचे संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नात असून, पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना उघडपणे पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे भारताच्या नाराजीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
भारतावर कर, आता मानवी हक्क हल्ला
अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर तब्बल 50 टक्के शुल्क लादले होते. आता मानवी हक्क अहवालातून भारताला लक्ष्य केल्याने दोन्ही देशांतील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.
अहवालात असा आरोप आहे की, मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यासाठी भारताने ‘फारच कमी विश्वासार्ह पावले’ उचलली आहेत.
पाकिस्तानला गुप्त लाभ?
अहवाल जाहीर करताना अमेरिकेने पाकिस्तानबाबतही टीका केली असली, तरी ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील
सततचा संपर्क, तसेच मुनीर यांना मिळणारा पाठिंबा हे भारतासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
काही विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे हे पाऊल वैयक्तिक हितसंबंधांशी संबंधित असून, त्यातून त्यांच्या कुटुंबालाही फायदा होत असल्याचा संशय आहे.
वॉशिंग्टनमधील भारत आणि पाकिस्तानच्या दूतावासांनी या अहवालावर अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/swadhar-yojneti-jachak-at-canceled-nitin-jamnik-pathapravyala-yash/