शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज एक रुपया!

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज एक रुपया!

गोपाळ विठ्ठल वासनकार यांचा आगळावेगळा उपक्रम

बाळापूर. – तालुक्यातील हाता गावातील शिक्षणप्रेमी लोकांनी शाळेसाठी एक अनोखा उपक्रम राबवून जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, हाता येथील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने गावातील शेतकरी गोपाळराव विठ्ठलराव वासनकार यांनी विशेष योजना जाहीर केली आहे.

या योजनेनुसार, वर्ग पहिलीत नावनोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षभर शाळेत येण्यासाठी रोज एक रुपया दिला जाणार आहे.

एकूण शालेय दिवसानुसार हे वार्षिक ३०० रुपये होतील. याचा प्रारंभ म्हणून १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक विद्यार्थ्याला १०० रुपये देण्यात येणार आहेत.

गोपाळराव वासनकार यांनी जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा टिकून राहावी, मराठी माध्यमाची गळती थांबावी, यासाठी ही योजना जिवंत असेपर्यंत राबवण्याचे आश्वासन दिले आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःची मुलगी सुप्रिया वासनकार हिला अकोला जिल्ह्यातील पहिली महिला डायव्हर म्हणून घडवले, तर मुलगा सुरज वासनकार हा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, मंगरूळपीर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील व परिसरातील पालकांनीही आपल्या मुलांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, हाता येथे प्रवेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/jagatil-5-sarvat-small-mobile-phone/