थंडी-वाजून तापाचा प्रादुर्भाव; घराघरात रुग्ण वाढल्याने नागरिक चिंताग्रस्त
जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी
बार्शी टाकळी :
तालुक्यात व्हायरल आजाराने घराघरात थंडी-वाजून तापाचे रुग्ण वाढले असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंजर परिसरात एका कुटुंबातील तिन्ही-चौघांना ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, खोकला व प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसत आहेत.
खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. पिंजर मंडळातील गावागावातून रुग्णांना दररोज उपचारासाठी पिंजर येथे आणले जात आहे.
आजार दीर्घकाळ (साधारण आठ दिवस) टिकत असून रुग्णांना अनेकदा सलाईन लावावी लागत आहे.
आजारामुळे कुटुंबातील स्वयंपाक व इतर घरकाम विस्कळीत झाले आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, जिल्हा आरोग्य विभाग व प्रशासन या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रत्येक गावात तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारून रुग्णांची तपासणी व उपचार करावेत, अशी मागणी होत आहे.
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेविकांची कमतरता
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य सेविकांची पदे रिक्त असून कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत असल्याने रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.
आरोग्य विभागाची प्रतिक्रिया
तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र कुमार आर्या यांनी सांगितले की, “घराघरात जाऊन सर्वेक्षण केले जाईल व रुग्णांना उपचार मिळतील.
नागरिकांनी स्वच्छता राखावी, पाण्याची भांडी आठवड्यातून दोन दिवस कोरडी ठेवावीत, घराभोवतीचे गवत काढावे. आरोग्य विभाग रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही.”
READ ALSO :https://ajinkyabharat.com/village-vani-yehe-jyeshtha-citizens-churchsatracha-organizing/