“भिंतीवर लिहिली विनाशाची तारीख? जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी”

"भिंतीवर लिहिली विनाशाची तारीख? जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी"

पुरीत खळबळ — जगन्नाथ मंदिर उडवून देण्याची धमकी; भिंतीवर लिहून दिला इशारा

पुरी (ओडिशा) : देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या जगन्नाथ मंदिराला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

मंदिराच्या जवळील एका छोट्या मंदिराच्या भिंतीवर उडिया भाषेत लिहिलेला इशारा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालीसाही परिसरातील ‘मां बूढी ठाकुराणी’ मंदिराच्या भिंतीवर लिहिलेल्या चेतावणीत म्हटले आहे — “दहशतवादी श्रीमंदिर (जगन्नाथ मंदिर) ध्वस्त करतील.

मला फोन करा, नाहीतर विनाश होईल.” यासोबतच भिंतीवर काही फोन नंबर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही लिहिलेले आढळले.

पोलीस सतर्क — युद्धपातळीवर तपास

पुरीचे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी घटनास्थळाची पाहणी करून सांगितले की, ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली आहे.

संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, हा इशारा मंगळवारी रात्री भिंतीवर लिहिला गेला असावा.

पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि या कृत्यामागील हेतू शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक तैनात असून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा

१५ ऑगस्टपूर्वी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पुरीतही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळांवर कडक तपासणी सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/ruthless-blood/