विजेचा शॉक लागून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

विजेचा शॉक लागून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

घराचा स्लॅब टाकताना घडली घटना

तेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे येथील घराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

हे काम करत असतांना येथे असलेल्या १३ ते १४ मजुरांना विजेचा झटका लागल्याची घटना घडली आहे.

या घटनेत एका अल्पवयीन बांधकाम मजूर असलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅबचे काम सुरू होते.

दरम्यान काल रात्री उशिरापर्यत त्यांच्या घराच्या स्लॅबचे काम पूर्ण झालं होतं.

बांधकाम आटोपल्यानंतर बांधकाम मिक्सर बाजूला नेत असताना अचानक मजुरांना विजेचा जोरदार शॉक लागला.

या मिस्करचा विजेच्या सर्व्हिस वायरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागला होता. यात जवळपास १४ बांधकाम मजुरांना हा विजेचा धक्का बसला.

मुलाचा मृत्यू ८ जण जखमी

बांधकाम सुरू असतांना मजुरांना विजेचा शॉक लागल्याची घटना घडली असताना ओमप्रकाश केशवराव जांभळे (वय १७) याचा घटनेत मृत्यू झालेल्या बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे.

तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तर ७ ते ८ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला.

बांधकाम ठेकेदार झाला पसार

घटनेत मृत मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, घटनेनंतर संबंधित बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला आहे.

तेल्हारा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या बांधकाम ठेकेदाराला अटक होते का? त्याच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करतात? हे पाहावं लागणार आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/photo-kadhanyavarun-jaya-bachchan-chidlya/