१५ ऑगस्टला मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य? अजित पवारांचा सरकारला सल्ला, राज्यात नवा पेच
मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगरसह काही शहरांमध्ये १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या निर्णयावरून विरोधाची लाट उसळली असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर भाष्य करत बंदी उचित नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, “मी ही बातमी टीव्हीवर पाहिली. श्रद्धेचा प्रश्न असल्यास काही वेळा अशी बंदी घातली जाते.
मात्र आपल्या राज्यात काही लोक शाकाहारी आहेत, तर काही मांसाहारी.
कोकणात साधी भाजी करतानाही नॉनव्हेज असते, तो त्यांचा आहार आहे.
त्यामुळे अशी सर्वसाधारण बंदी घालणं योग्य नाही.”
ते पुढे म्हणाले, “महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात.
भावनिक मुद्दा असेल तर लोक ते स्वीकारतात, पण २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्टला मांसविक्री बंदी घालणं अवघड आहे.
हे माझं वैयक्तिक मत आहे.”
अजित पवारांच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.
बंदी कायम ठेवायची की उठवायची, यावर राज्य सरकारचा अंतिम निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील खाटीक समाजाने महापालिकेला थेट इशारा दिला आहे.
“शहरात खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई अशी अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याऐवजी आमच्या पोटावर पाय देतायत.
बंदीचा निर्णय मागे घेतला नाही, तर १५ ऑगस्टलाच महापालिका मुख्यालयाच्या गेटवर मटन विक्री करू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/indo-top-10-shrimant-family-bijnes-jaheer/