अकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री संत नागास्वामी महाराजांच्या पदप्रशस्त पावन झालेल्या ग्रामदैवताच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या
मंदिरातील रथयात्रा आज भक्ती, उत्साह आणि वाजतगाजत संपन्न झाली.
सकाळी आठ वाजता गावापासून एक किलोमीटर अंतरावरील महाराजांच्या बैठकस्थानी पालखी नेण्यात आली.
भजनी मंडळ, दिंड्या आणि भक्तांच्या गजरात पालखी मंदिरात दाखल झाली.
सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी गोपाळकाळाचा कार्यक्रम पार पडला आणि दहीहंडी फोडण्यात आली.
फुलांनी सजविलेल्या रथात श्रींच्या पादुका ठेवून भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली.
पंचक्रोशीतील भजनी मंडळ, दिंड्या, डफडेवाले, बँड पथक यांच्या सहवासात रथाने गावभर फेरी मारली.
मिरवणुकीदरम्यान गावात ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारी दोन वाजता मंदिरात महाप्रसादास सुरुवात झाली.
यात्रेदरम्यान अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गावकरी, युवा मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि आकाशी पाळणेवाल्यांनी यात्रेची शोभा वाढवली.
पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.