१५ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेशासाठी केवळ ‘डिजीप्रवेश’ अॅपद्वारे ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
मुंबई – मंत्रालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश मिळणार आहे.
‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन अॅप-आधारित प्रणालीद्वारे प्रवेश पास घेणे १५ ऑगस्टपासून बंधनकारक होणार असून, याबाबत महाराष्ट्र गृह विभागाने ११ ऑगस्ट रोजी आदेश जारी केला आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात विविध कारणांसाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संघटनांचे पदाधिकारी भेट देत असतात.
मात्र आता प्रवेशासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यासारखे शासनमान्य ओळखपत्र आणि ‘डिजीप्रवेश’ अॅपद्वारे नोंदणी आवश्यक असेल.
स्मार्टफोन किंवा अॅप वापरण्याची सुविधा नसलेल्यांसाठी गार्डन गेट येथे नोंदणी व मदतीसाठी विशेष खिडकी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
‘डिजीप्रवेश’ अॅप अँड्रॉईड व iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.
एकदाच नोंदणी करून आधार क्रमांकावर आधारित छायाचित्र पडताळणी केल्यानंतर संबंधित विभागाचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय मंत्रालयात प्रवेश घेता येईल.
संपूर्ण प्रक्रिया तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होते.
दरम्यान, या नियमावलीवरून विरोधकांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबुब शेख यांनी म्हटले आहे की, “स्मार्टफोन, इंटरनेट किंवा अॅप वापरण्याची क्षमता नसलेल्या ग्रामीण नागरिकांसाठी मंत्रालयाचे दरवाजे कायमचे बंद होत आहेत.
लोकशाहीत जनता आणि सरकार यांच्यातील दरवाजे उघडे असायला हवेत; तंत्रज्ञान सोयीसाठी असते, अडथळा बनवण्यासाठी नाही.”
Read also :https://ajinkyabharat.com/ek-hindu-yuvakacha-jeev-vachvanyasathi-musleem-youth-martyred/