मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबई चलोचा निर्धार : जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा

मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबई चलोचा निर्धार : जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा

मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोठ्या मोर्चासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आवाहन

करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

“आरक्षणाचा तुकडा पाडणार, तेही ओबीसीतूनच घेणार.

मराठा-ओबीसी दंगल घडली तर त्याला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

फडणवीस हे ओबीसींसाठी लढणार असल्याचे सांगतात, म्हणजे ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत, असा याचा अर्थ होतो, असा टोला त्यांनी लगावला.

फलटण येथे मराठा बांधवांच्या बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले,

“सरकार २९ ऑगस्टला मराठा आरक्षण देतं की नाही, ते मी पाहतो. फडणवीस मराठा-ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, आम्ही भांडणार नाही. उलट दोन्ही समाज एकत्र येऊन त्यांना उत्तर देतील.”

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात कोल्हापूर, सांगली, सातारा येथील मराठा समाजाची उत्स्फूर्त गर्दी पाहून मोर्चाबाबत आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा आणि विदर्भातूनही तितक्याच ताकदीने सहभाग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“मराठ्यांच्या मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट मिळत नाही, त्यांचीच बदनामी केली जाते.

सर्व पक्षातील मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपलाही याचा फटका बसणार आहे,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

२९ ऑगस्टचा ‘मुंबई चलो’ मोर्चा यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Read Also :https://ajinkyabharat.com/rakhi-vikreela-udhan-attractive-rakthancha-arrives/