मध्यप्रदेश येथे अपघातात पातूरचे दोन भाविक ठार, नऊ गंभीर जखमी
मध्य प्रदेशातील शिवनी येथील घटना
अकोला:–
कावड यात्रेच्या भक्तीमय वातावरणावर मृत्यूचे काळे सावट पसरले!
मध्यप्रदेशातील शिवणी येथे पार पडणाऱ्या कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात घडला असून यात अकोला जिल्ह्यातील
पातूर शहरातील दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नऊ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री मध्यप्रदेश मधील बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोर गरठिया गावाजवळ घडली.
भरधाव ट्रकने कावड यात्रेत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरला व पायी चालणाऱ्या भाविकांना मागून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत बंडू पांडुरंग बंड व अविनाश विजय पोहरे (दोघेही रा. पातूर) यांचा मृत्यू झाला.
जखमी भाविकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पातूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shivaji-college-akravichya-vidyarthakhe-thaatat-welcome/