दानापूर परिसरातील नदी-नाले अद्यापही कोरडे

दानापूर परिसरातील नदी-नाले अद्यापही कोरडे

विहिरीची पाणी पातळी वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत

दानापूर (वा) नंदकिशोर नागपुरे

पावसाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिने झाले; मात्र अद्यापही जोरदार

पाऊस न पडल्याने दानापूरसह परिसरातील नदी -नाले अद्यापही कोरडे पडले आहेत.

त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

तेल्हारा तालुक्यातील काही शेती कोरडवाहू आहे तर काही बागायती आहे.

परिसरात भाजीपालावर्गीय व फळबाग पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात;

मात्र दोन ते अडीच महिने उलटल्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे;

मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे नदी-नाले अद्यापही कोरडी पडली आहेत.

त्यामुळे रिपरिप पावसाने फक्त पिकांना जीवनदान मिळत आहे.

तर परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे,

त्यामुळे यावेळी पीक निघून जाईल; मात्र भविष्यात काय?

येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही तर हंगामी पिके

शेतकऱ्याच्या हातातून जातात की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यात भुईमूग, भाजीपाला व फळबागांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते;

मात्र येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास या पिकांना फटका बसणार आहे.

वान नदी कोरडीच

सातपुड्याच्या कुशीतून वाहणारी वान नदी एके काळी बाराही मास वाहत होती;

मात्र याच वान नदीवर वान धरण बांधण्यात आल्याने पाणी आता धरणात साठवले जाते;

मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या बाहेरून वाहणारी आडनदी हीसुद्धा वान नदीला येऊन मिळते.

मात्र आडनदी वाहत नसल्याने वान नदीच्या पोटातून अजुन एक थेंब सुध्दा बाहेर पडला नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/actress-huma-qureshiichya-chulat-bhavacha-khoon/