शाळकरी मुलांवर हल्ले, रस्त्यावर मोकाट जनावरांचा त्रास — नागरिकांमध्ये तीव्र संताप**
कारंजा (सुनील फुलारी) –
कारंजा शहर सध्या मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या प्रचंड उपद्रवामुळे हैराण झाले असून,
या समस्येने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात घातक अडथळा निर्माण केला आहे.
शाळकरी मुलांवर कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकार वाढले असून, अनेक अपघात व गंभीर प्रसंगांची नोंद झाली आहे.
शहरातील प्रत्येक गल्ली, चौक, रस्ते हे मोकाट कुत्र्यांचे अड्डे बनले असून,
दिवसा तसेच रात्रीच्या वेळी या कुत्र्यांच्या टोळक्यांचा उपद्रव अधिक जाणवतो.
शाळा, कॉलेज, कार्यालय आणि बाजारपेठांमध्ये या कुत्र्यांमुळे महिलांना आणि लहान मुलांना
विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
याचबरोबर शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरेही प्रचंड प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत.
रस्त्यावरच ही जनावरे बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे.
विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते.
काही ठिकाणी हे जनावरे अचानक समोर आल्याने अपघातांचं प्रमाणही वाढू लागलं आहे.
नगरपालिकेवर नागरिकांचा रोष
या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे पुन्हा एकदा वाळूत डोके खुपसल्याप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे.
नगरपालिकेचे अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शहरातील सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि जागरूक नागरिकांनी यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया नोंदवत,
तात्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि मोकाट जनावरांवर नियंत्रण आणावं, अशी मागणी केली आहे.
“जनतेचा संयम सुटण्याआधी उपाययोजना करा!”
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही,
तर तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल.
कारंजा शहरात राहणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी आता एकत्र येत नगरपालिकेकडे ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाला जाग येणार का?
मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त कधी होणार?
शाळकरी मुलांचे आयुष्य सुरक्षित कधी होणार?
याची उत्तरं मिळण्यासाठी आता संपूर्ण शहराचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/karanja-shaharat-lightcha-lapandav/