पुसद: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज पुसद तालुक्यातील गहुली येथे
आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
सत्तेतील लोक सर्पापेक्षाही विषारी आहेत. अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
बैठकीची सुरुवात राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील अंबोडा येथील गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच, यात्रेदरम्यान सहभागी झालेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले की, हे सरकार मणियार जातीचे आहे, जे चावलेले लक्षातही येत नाही.
त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासही तयार होते,
तर आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे? असे विचारतात या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित केला.
सर्वात जास्त आत्महत्या करणारा शेतकरी हिंदू नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये रोज खून होत असल्याचे म्हटले, तसेच राज्य बदलले की धान्याचे दर बदलतात, असेही नमूद केले.
यवतमाळ हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
येत्या राखी पौर्णिमेला पंतप्रधानांना शेतकरी विधवांच्या हस्ते काळी राखी बांधून राखी पौर्णिमा उत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना बुद्धी यावी यासाठी येत्या पदयात्रेत फिरता गणपती बसवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.