अकोला : जिल्हा व आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
(जीएमसी) अकोला येथे दाखल होत आहेत.
विशेषतः पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, विषमज्वर यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
परिणामी रुग्णालयात मोठी गर्दी होत असून औषध वाटप विभागात लांबच लांब रांगा लागत आहेत.
दिनांक 28 जुलै, सोमवार दुपारी 1 वाजताच्या सुमारास औषध वितरण विभागात औषध घेण्यासाठी रंगाचा रांगा दिसून आल्या.
सध्या औषध वितरणासाठी रुग्णालयात दिव्यांग, पुरुष, महिला आणि कर्मचारी अशा चार वेगवेगळ्या खिडक्या कार्यरत आहेत.
मात्र, या मर्यादित खिडक्यांमुळे रुग्णांना औषधे मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे.
वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांचे नातेवाईक विशेषतः त्रस्त झाले आहेत.
वाढत्या गर्दीमुळे वादावादीच्या घटना घडत असून, रुग्णसेवेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पावसाळ्यात साथीचे रोग पसरत असल्याने जीएमसी मध्ये दररोज शेकडो रुग्णांची नोंद होत आहे.
उपचारानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्यासाठी रुग्णालयाच्या औषध वितरण केंद्रावर मोठी गर्दी होत असून व्यवस्थापन पुरेसे न झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी औषध वितरण खिडक्या वाढवून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात,
अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वेळेवर औषध न मिळाल्यामुळे रुग्णांची स्थिती अधिक बिघडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-taluka-animal-veterinary-dispensary-pathetic-state/
