खामगाव (जि. बुलढाणा) –
गाय चोरी केल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे कपडे उतरवून अपमानित
केल्याची धक्कादायक घटना २३ जुलै २०२५ रोजी खामगाव शहरात घडली.
पीडित तरुण रोहन पैठणकर याच्यावर रोहित पगारीया, गब्बू गुजरीवाल, आणि प्रशांत संगेले या तिघांनी हल्ला केला असून,
जात पाहण्यासाठी त्याचे अंतर्वस्त्र उतरविण्यात आले. या अमानुष प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 227/25 अन्वये अॅट्रॉसिटी कायदा तसेच भारतीय
न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र अद्याप संबंधित आरोपींवर ठोस कार्यवाही न झाल्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ (देवराव) हिवराळे यांनी उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी
यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ अटकेची व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरोपी गब्बू गुजरीवाल याच्यावर यापूर्वी MPDA अंतर्गत कारवाई झाली
असून त्याच्यासह अन्य दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.
त्यामुळे या आरोपींना तडीपार करावे आणि पुन्हा MPDA अंतर्गत कठोर कारवाई करावी.
मुख्य आरोपी रोहित पगारीया हा समाजात द्वेष पसरवणारी व जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये वारंवार करतो.
त्याच्या कथित संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी
आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dr-manjiri-karande-yana-ph-d-guarding-recognition/