परभणी :
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
रस्ते, वस्त्या, शाळा आणि बाजारपेठा सर्वत्र पाण्याखाली गेल्या आहेत.
पाथरी तालुक्यातील हदगाव परिसरात स्थानिक नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेली आहे.
शाळेतील साहित्य आणि इतर सुविधा यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे, इंदिरानगर वस्तीत पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातही पाणी साचल्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकत्याच पेरलेल्या पिकांवर पाणी फिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, सध्या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
यामधून तब्बल 17,641 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे.
त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक नद्यांना पूर आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.