अकोट | शेगाव – अकोट-शेगाव मार्गावरील लोहारा गावाजवळील पूल आज सकाळपासून पूर्णतः बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोहारा गावाजवळील हा पूल मागील काही महिन्यांपासून खचत असून, आज सकाळी पाण्याचा जोर वाढल्यामुळे पुलाच्या पायाभूत रचनेवर ताण आला आणि वाहतूक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे अकोट-शेगाव मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे, मात्र ते मार्ग ही खराब अवस्थेत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.
स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून, पूल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोहारा पुलावरील स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.