बीड: जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे.
आठवड्यात तीन मातांचे मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छाया पांचाळ या मातेचा रविवारी प्रसूतीनंतर मृत्यू झाला, त्यानंतर सोमवारी पुन्हा
एका मातेचा मृत्यू झाला असून, याआधी आणखी एक महिला मरण पावली होती.
या प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला असून,
छाया पांचाळ यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मात्र, चौकशीपूर्वी कागदपत्रांमध्ये फेरफार आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा सुरू आहे.
डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकाचा तात्पुरता कार्यभार असला तरी,
डॉ. अशोक थोरात यांच्या निलंबनानंतर यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, असा आरोप होत आहे.
आवादा एनर्जी प्रकल्पात चोरी करणारी टोळी जेरबंद; मकोका अंतर्गत कारवाईची तयारी
बीड: आवादा एनर्जी प्रकल्पावर झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी चार चोरांना अटक केली आहे.
दहा जणांच्या टोळीने प्रकल्पावर सुरक्षा रक्षकांना बांधून ११ लाखांचे साहित्य चोरले होते.
बीड पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळताना या टोळीवर देशभरात एकूण २७ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांनी या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे.
हीच टोळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरही संशयाच्या भोवऱ्यात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/varanasi-gang-rape-case-dcp-chandrakant-meena-hatwale-pantpradhan-modi-angry/