” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….

" मौन रात्रीचा संवाद मनाशी "....

मौनात गुंतलेले शब्द अनोळखीसे वाटतात,

डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या आठवणींनी हळवतात,

दिवसाने नाकारलेली भावना रात्री ओंजळीत घेते,

Related News

आणि प्रत्येक अश्रूत ती एक सखी होऊन बसते .…

“कुणालाही न सांगता येणाऱ्या मनातल्या गोष्टी आपण रात्रीला सांगत असतो .…”

ही भावना केवळ एक विचार नाही, ही एक जगणं असतं ….

एक अनुभव आयुष्यातील ….

प्रत्येकाच्या मनात एक कोपरा असतो …. जिथं शब्द नाही पोहोचत, फक्त भावना वसतात.

त्या भावना दिवसाच्या आवाजात हरवतात, लोकांच्या गर्दीत हरवून जातात,

पण रात्र झाली की त्या सगळ्या गूढशब्दांना एक आवाज मिळतो.

रात्र म्हणजे काळोखाचं पांघरूण नाही, तर ती आहे आपल्या आतल्या गोंधळाची, असमाधानाची, अस्वस्थतेची शरणस्थिती .

दिवसभराच्या नकळत्या अभिनयानंतर, संपूर्ण जग आपल्याला जेव्हा विसरून जातं,

तेव्हा रात्र मात्र आपल्या नकळतच आपल्या अंतर्यामीच्या खुणा वाचत असते.

रोजच्या धावपळीने थकलेल्या शरीरासारखंच एक थकलं भागलेलं मनही असतं.

ज्याला आराम हवा असतो, समजून घेणं हवं असतं, कोणीतरी ऐकावं अशी खंत असते.

पण त्या मनाचं दुःख …. ते फारच खास, फारच गुपित असतं. कधी प्रेम अपूर्ण राहतं,

कधी आपल्याच लोकांनी आपल्याला सोडून दिलेलं असतं, कधी स्वप्नं अपुरी राहिलेली असतात .…

आणि कधी कधी आपणच आपल्याला समजू शकत नाही, हेही दुःख असतं.

ही सगळी मनातली चीड, खंत, निराशा, भिती, एकाकीपणा .…

आपण कुणाला सांगू शकत नाही. कारण समजून घेणं ही कला सगळ्यांकडे नसते ….

पण रात्र ….? ती कुठे बोलते ….?

कुठे टोचते ….? ती फक्त ऐकते …. आणि ऐकून घेत राहते ….

कधी उशीच्या एका कोपऱ्यात आपले अश्रू सांडले जातात, आणि त्या अश्रूंना आपणच हात लावतो.

पण कोणी विचारत नाही, “का रडलास ….?”

कारण त्या वेळी फक्त रात्र असते …. आपल्या अश्रूंची साक्षीदार ….

ती कुठे सांत्वन करत नाही, पण ती शांतपणे सोबत करत राहते …. जगाच्या गोंधळापासून दूर,

आपल्या आतल्या वेदनांच्या अगदी जवळ.

रात्र म्हणजे जुन्या आठवणींंचा संग्रहालय. तिच्या शांततेत हरवलेले आवाज पुन्हा ऐकू येतात ….

आईच्या अंगाईची झुलणारी लय, लहानपणीच्या पावसात भिजताना दिलेली ओलसर हाक,

एखाद्या अपूर्ण प्रेमाचा अनुत्तरित ‘कधी भेटशील ….?’

असा संदेश ….

हे सारे शब्द विरघळून जातात त्या शांत रात्रीच्या कुशीत.

कधी तरी आपण स्वतःलाच विचारतो …. “मी खरंच इतका बदललोय का ….?”

रात्र मग आरशासारखी भासत जाते ….

जी आपलं खरं प्रतिबिंब दाखवते. ती नकळत आपल्याला आपल्या चुका दाखवते,

परत काहीतरी गवसण्याची उमेद देते, आणि विसरण्याचीही परवानगी देते.

ती क्षमा करते, स्वीकार करते, आणि सर्वात महत्त्वाचं …. ती कधीही आपल्याला दोष देत नाही.

रात्र म्हणजे एक हळुवार स्मृती ….
ज्या वेळी कुणीतरी “कसा आहेस ….?”

विचारलं पाहिजे होतं आणि कोणीच विचारलं नाही,

त्या वेळी रात्र असते.

ज्या वेळी आपण अपयशाच्या गर्तेत अडकलेलो असतो, आणि जग फक्त निकाल बघत असतं,

त्या वेळी रात्र आपल्या बाजूने उभी असते.

ज्या वेळी “मी ठीक आहे” हा खोटा मुखवटा लावून आपण दिवसभर जगतो,

त्या रात्री त्या मुखवट्याखालचा खरा चेहरा ओळखणारी एकमेव सखी …. रात्रच असते.

ती कधी प्रश्न विचारत नाही, कधी शंका घेत नाही, आणि कधी “तसं नको होतं” असं म्हणत नाही.

ती फक्त असते …. एकदम शांत, पण समजून घेणारी.

कधी कधी वाटतं …. जर रात्र नसती तर , हे मन केव्हाच फुटून गेलं असतं.

ही रात्रच आहे जी आपल्याला बांधून ठेवते ….. नात्यांमध्ये, जगण्यात, आणि स्वतःत.

म्हणूनच, प्रत्येक रात्री…

कुणालाही न सांगता येणाऱ्या मनातल्या गोष्टी,

मी त्या गूढ आभाळाला, त्या झाडांच्या सावल्यांना, त्या चांदण्यांच्या नीरव डोळ्यांना सांगतो .…

कारण त्यांना काहीच म्हणायचं नसतं… फक्त ऐकायचं असतं.

मनातलं सगळं त्या अंधाराशी गुजगोष्टीत सांगितलं जातं,

चांदण्यांच्या साक्षीने मौनही एक संवाद बनतं,

जगाने न ऐकलेल्या भावना ती रात्र ऐकते…

म्हणूनच, तीच माझ्या अंतरंगाची खरी सखी ठरते ….!
—————————-
डॉ . विनय वसंतराव दांदळे ,
वसंतकुंज , गोकुळ कॉलनी ,
अकोला – ४४४००१.
सुसंवाद – ९८२२२३१७६९.

Related News