Bharat Tribal Health Observatory म्हणजे काय ?
Bharat Tribal Health Observatory (B-THO) ही भारतातील आदिवासी समुदायांच्या आरोग्यस्थितीचे वैज्ञानिक, पद्धतशीर आणि सातत्यपूर्ण निरीक्षण करणारी राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल आरोग्य वेधशाळा असेल. आजपर्यंत आदिवासी आरोग्याशी संबंधित माहिती ही तुटक, अपुरी आणि अनेकदा एकसंध स्वरूपात उपलब्ध नव्हती. हीच पोकळी भरून काढण्यासाठी Bharat Tribal Health Observatory ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.
या वेधशाळेच्या माध्यमातून आदिवासी समुदायांसाठी जमातीनिहाय (Tribe-wise) आरोग्य डेटा संकलन केले जाणार आहे. कोणत्या जमातीत कोणते आजार जास्त प्रमाणात आढळतात, पोषणस्थिती काय आहे, माता व बालमृत्यूचे प्रमाण किती आहे, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे स्वरूप काय आहे, याचे सखोल विश्लेषण येथे केले जाईल.
याशिवाय, रोगप्रसारावर वैज्ञानिक पद्धतीने निरंतर पाळत (Continuous Surveillance) ठेवली जाणार आहे. म्हणजेच एखाद्या आजाराचा उद्रेक होण्याआधीच त्याची लक्षणे, ट्रेंड आणि धोके ओळखून वेळीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यामुळे आदिवासी भागांतील आरोग्य संकटे रोखण्यास मोठी मदत होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती (Evidence-based Policy Making) ही Bharat Tribal Health Observatory ची कणा ठरेल. अंदाज, अनुभव किंवा अपुऱ्या माहितीतून नव्हे, तर अचूक डेटा आणि संशोधनाच्या आधारावर धोरणे आखली जातील. परिणामी, आदिवासी-विशिष्ट आरोग्य विषमता कमी करण्यासाठी लक्ष केंद्रीत आणि परिणामकारक हस्तक्षेप करता येतील. त्यामुळे ही वेधशाळा भारतातील आदिवासी आरोग्य क्षेत्रातील दीर्घकाळची माहितीची दरी भरून काढणारी ठरणार आहे.
प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत ऐतिहासिक MoU
आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ICMR–RMRC, भुवनेश्वर यांच्यात होणारा सामंजस्य करार (MoU) हा केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून, तो Bharat Tribal Health Observatory साठीचा मजबूत आणि दीर्घकालीन पाया आहे. प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत होणारे हे सहकार्य आदिवासी आरोग्य संशोधनाला संस्थात्मक स्वरूप देणारे ठरणार आहे.
या MoU अंतर्गत आदिवासी जिल्ह्यांमध्ये Tribe-wise Health Surveillance राबवली जाणार आहे. याचा अर्थ प्रत्येक जमातीची स्वतंत्र आरोग्य ओळख (Health Profile) तयार केली जाईल. त्यासोबतच अंमलबजावणी संशोधन (Implementation Research) केले जाईल, ज्यातून सरकारी योजना प्रत्यक्षात किती प्रभावी ठरत आहेत, याचे मूल्यमापन होईल.
रोग निर्मूलनासाठी एक संस्थात्मक संशोधन चौकट विकसित केली जाणार असून, त्याला सुरक्षित डिजिटल हेल्थ डॅशबोर्ड आणि GIS-सक्षम विश्लेषण प्रणाली यांची जोड दिली जाईल. यामुळे आजवर अंदाजावर किंवा अपुऱ्या माहितीतून घेतले जाणारे निर्णय आता डेटा आणि विज्ञानावर आधारित असतील, ही या कराराची सर्वात मोठी ताकद आहे.
राष्ट्रीय क्षमता-बांधणी कार्यक्रम: आदिवासी वैद्यांचा सन्मान
Bharat Tribal Health Observatory ची घोषणा ज्या राष्ट्रीय क्षमता-बांधणी कार्यक्रमात होणार आहे, तो कार्यक्रम स्वतःतच ऐतिहासिक आहे. भारत सरकार पहिल्यांदाच आदिवासी आणि स्थानिक वैद्यांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अधिकृत घटक म्हणून मान्यता देत आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आदिवासी वैद्यांचे औपचारिक एकत्रीकरण करणे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले पारंपरिक वैद्यकीय ज्ञान केवळ लोककथांपुरते न राहता, त्याचे संरक्षण, दस्तऐवजीकरण आणि वैज्ञानिक पडताळणी करणे हा यामागचा हेतू आहे. त्याचबरोबर, आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधून, नैतिक आणि वैज्ञानिक चौकट विकसित केली जाणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, हा उपक्रम लोकल नॉलेज + सायंटिफिक एप्रोच यांचा प्रभावी संगम आहे, जो आदिवासी आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देईल.
मान्यवरांची उपस्थिती आणि केंद्र सरकारची वचनबद्धता
या राष्ट्रीय कार्यक्रमाला माननीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम, माननीय राज्यमंत्री दुर्गादास उइके, आदिवासी व्यवहार सचिव श्रीमती रंजना चोप्रा, विविध केंद्रीय मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. ही मान्यवर उपस्थिती Bharat Tribal Health Observatory संदर्भात केंद्र सरकारची उच्च-स्तरीय वचनबद्धता स्पष्टपणे दर्शवते.
आदिवासी आरोग्यात मंत्रालयाची आघाडी
गेल्या काही वर्षांत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आरोग्य क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियान, क्षयरोग, मलेरिया व कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, PM Janman योजना आणि Dhartii Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan यांसारख्या उपक्रमांमुळे मंत्रालय आदिवासी आरोग्य सुधारण्यात अग्रस्थानी राहिले आहे. Bharat Tribal Health Observatory या सर्व योजनांना वैज्ञानिक आधार देणारी केंद्रीय यंत्रणा ठरणार आहे.
ICMR-RMRC भुवनेश्वरची भूमिका
ICMR-RMRC भुवनेश्वर ही संस्था आदिवासी आरोग्य संशोधनातील अग्रगण्य मानली जाते. Bharat Tribal Health Observatory अंतर्गत ही संस्था संशोधन डिझाइन, डेटा अॅनालिटिक्स, रोग ट्रेंड विश्लेषण आणि धोरण सल्ला देण्यासाठी तांत्रिक नेतृत्व करणार आहे.
आदिवासी आरोग्यासाठी नवा अध्याय
एकंदरीत पाहता, Bharat Tribal Health Observatory ही केवळ एक सरकारी योजना नसून, ती आदिवासी विकासाच्या दिशेने एक क्रांतिकारी, ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी चळवळ आहे. पारंपरिक ज्ञान, आधुनिक विज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत भारत सरकारने आदिवासी आरोग्यासाठी एक शाश्वत, न्याय्य आणि भविष्याभिमुख मार्ग खुला केला आहे. हा उपक्रम देशातील सर्वात वंचित आदिवासी भागांमध्ये आरोग्य समानता, विश्वास आणि सशक्तीकरण निर्माण करेल, यात शंका नाही.