मुंबई : ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचं शुक्रवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र गुरुवारी रात्रीपासून त्यांची तब्येत अचानक खालावली आणि अखेर शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने ठाणे शहरासह वैद्यकीय, साहित्य, नाट्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ठाण्यातील समता नगर परिसरात राहणारे डॉ. आनंद नाडकर्णी हे गेली अनेक दशकं मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी हजारो रुग्णांना मानसिक तणाव, नैराश्य, व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केलं. “सुदृढ मन सर्वांसाठी” हे ब्रीद घेऊन त्यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.
36 वर्षांपूर्वी उभारली मानसिक आरोग्याची चळवळ
डॉ. नाडकर्णी यांनी 1980 साली एमबीबीएस आणि 1984 साली मनोविकारशास्त्रात एमडी पदवी मिळवली. मानसिक आजारांविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांनी 23 मार्च 1990 रोजी ठाण्यात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी मानसिक आरोग्य जागरूकतेची मोठी चळवळ उभी केली.
Related News
त्यांनी केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे तर व्याख्याते, लेखक आणि प्रेरणादायी समुपदेशक म्हणूनही स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या भाषणांमध्ये विज्ञान, अध्यात्म, जीवनमूल्य आणि मानवी नातेसंबंध यांचा सुंदर समतोल पाहायला मिळायचा.
साहित्य, नाटक आणि संगीत क्षेत्रातही मोठं योगदान
डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मनोविकारतज्ज्ञ नव्हते, तर ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ‘शहाण्यांचा सायकिएट्रिस्ट’, ‘मनमैत्रीच्या प्रदेशात’, ‘गद्धेपंचविशी’, ‘वैद्यक सत्ता’ यांसारखी सुमारे 27 पुस्तकं लिहिली. त्यांच्या लेखनातून मानसिक आरोग्य, समाजातील बदलती मूल्यं आणि मानवी मनाचे विविध पैलू उलगडले गेले.
नाट्यक्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘रंग माझा वेगळा’ यांसारखी नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ते उत्तम तबलावादक, चित्रकार आणि संगीतप्रेमी म्हणूनही ओळखले जात होते.
व्यसनमुक्ती क्षेत्रातही मोठं कार्य
डॉ. नाडकर्णी यांनी दिवंगत डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने पुण्यात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्थेमुळे हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाची नवी दिशा मिळाली.
त्यांच्या कार्यपद्धतीत माणुसकी, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुंदर मिलाफ दिसून येत होता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ते डॉक्टरपेक्षा जास्त एक विश्वासू मित्र बनले होते.
एकनाथ शिंदेंकडून भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं की, “डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी साडेतीन दशकं मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात निरलसपणे काम केलं. हजारो अस्थिर मनांना त्यांनी आधार दिला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक संवेदनशील डॉक्टर, लेखक आणि समाजसेवक गमावला आहे.”
ठाण्यात होणार अंत्यसंस्कार
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनानंतर डॉक्टर, साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
मानसिक आरोग्याविषयी समाजात सकारात्मक विचार निर्माण करणारा एक मोठा आवाज आज कायमचा शांत झाला आहे. मात्र त्यांनी केलेलं कार्य आणि विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
