महाराष्ट्रात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चाललाय. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, जालना, रायगड आणि पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आणि इतर भागांसाठी ऑरेंज अलर्टदेखील जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना प्रशासनाने अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. राज्यात रात्रभर पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे, दुपारी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. राहाता तालुक्याला प्रचंड पावसाने झोडपले असून ओढ्या आणि नाल्यांना पूर आला आहे, तर शेती पाण्याखाली गेली आहे. शिर्डी परिसरातून जाणारा नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिर्डीतील ओढ्यात रात्री दोन जण वाहून गेले; प्रशासनाच्या मदतीने त्यांना वाचवण्यात यश आले. पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आला असून, पहाटे 3 वाजता 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना जिल्ह्यात सायंकाळ आणि मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ या परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थोरात कुटुंबाला संकटात टाकले. 70 वर्षीय सहदेव थोरात आपल्या नऊ बकऱ्यासह नाल्याच्या मध्यभागी अडकले. ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतर चार तासांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहावे, पावसामुळे पूरग्रस्त भागातून प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचना काटेकोर पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/maharajaswa-samadhan-shibir-yashasvi/