नागपूर, 11 फेब्रुवारी 2026 : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीसोबत पाऊल टाकत महावितरणने वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला आहे. नागपूर परिमंडलात आतापर्यंत तब्बल 5 लाख 62 हजार 186 ग्राहकांकडे अत्याधुनिक ‘स्मार्ट टीओडी’ (टाइम ऑफ डे) मीटर बसवण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना अचूक बिल मिळण्यासोबतच वीजदरात सवलतीचाही लाभ मिळणार आहे.
महावितरणच्या या उपक्रमामुळे पारंपरिक मीटरची जागा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मीटर घेत आहेत. घड्याळ, मोबाईल आणि टीव्हीप्रमाणेच आता वीज मीटरही स्मार्ट झाल्याने बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. या मीटरमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय वीज वापराची अचूक नोंद थेट मुख्यालयात पोहोचते. त्यामुळे ‘सरासरी’ किंवा ‘अंदाजे’ बिलांचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागणार नाही.
हे स्मार्ट मीटर पूर्णपणे पोस्टपेड स्वरूपाचे असून ग्राहकांना सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच बिल भरावे लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी महावितरणने कोणतेही कर्ज घेतलेले नाही. केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याने ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा अनामत रक्कम आकारली जात नाही. जुने मीटर बदलणे ही नियमित प्रक्रिया असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
Related News
स्मार्ट मीटरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘टीओडी’ सवलत योजना. 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या निर्णयानुसार, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. त्यामुळे दिवसा वीज वापर वाढवल्यास मासिक बिलात लक्षणीय घट होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाचा मासिक वापर 100 युनिट असेल तर सुमारे 875 रुपयांचे बिल सवलतीमुळे अंदाजे 784 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
याशिवाय, महावितरणच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना तासागणिक वीज वापराची माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि अनावश्यक वीज वापर टाळता येईल. ऊर्जा बचतीसाठीही हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
नागपूर परिमंडलातील विविध मंडलांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागपूर शहर मंडलात 3 लाख 1 हजार 313, नागपूर ग्रामीण मंडलात 1 लाख 52 हजार 571, तर वर्धा मंडलात 1 लाख 8 हजार 302 मीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात समान पद्धतीने आधुनिक वीज व्यवस्थेचा विस्तार होत असल्याचे दिसून येते.
‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांसाठीही हे मीटर उपयुक्त ठरणार आहेत. स्मार्ट मीटरमध्ये नेट मीटरिंगची सुविधा उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे. वीजबिलात पारदर्शकता वाढवणे, ग्राहकांना थेट सवलत देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दिवसा वीज वापर वाढवावा आणि बिलात बचत करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरमुळे भविष्यात अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख वीज सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
