७२ तासांत गुन्हा उघड, ३१ मोबाईलसह साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
रिसोड : शहरातील गजानन नगरातील तरुणाने मोबाईल शॉपी फोडून ७ लाख ३४ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचा गुन्हा दाखल होताच रिसोड पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत कारवाई करत आरोपीला गजाआड केले. यावेळी चोरलेले ३१ मोबाईल, स्मार्ट वॉचेस, इअरबड्स असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.सागर मोबाईल शॉपीचे शटर कटरने तोडून चोरी झाल्याची फिर्याद फिर्यादी अमोल चंद्रकांत उखळकर यांनी १६ सप्टेंबर रोजी पोलिसांत दिली होती. घटनेनंतर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.त्यानुसार पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चार तपास पथके तयार करण्यात आली. डिबी पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त माहीतीच्या आधारे आरोपी शाहील शाह (वय १८, रा. गजानन नगर, रिसोड) याचा कोल्हापूर, सातारा, पुणेपर्यंत पाठलाग केला. अखेर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेला साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त मालामध्ये Vivo कंपनीचे ३१ मोबाईल, स्मार्ट वॉचेस ३, इअरबड्स २ नग यांचा समावेश आहे. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोउपनिरीक्षक सचिन गोखले, पोहवा. प्रशांत राजगुरु, आशिष पाठक, अनिल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल विनोद घनवट, रवि अडागळे, परमेश्वर भोने, सुनिल तिवाले, विश्वास चव्हाण, राजेश गांगवे व सुशिल इंगळे यांचा सहभाग होता. रिसोड पोलिसांनी केवळ ७२ तासांत हा गुन्हा उघडकीस आणत पुन्हा एकदा चपळाई आणि तत्परतेचा ठसा उमटवला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/marriage-scam-lagnachaya-pahlya-raatri-sona-banad-lampas/
