41 बेकायदेशीर इमारती आणि आरक्षित भूखंडावरील बोगस बांधकाम…

IAS अनिलकुमार पवार प्रकरणाचा थरार

कोटींची रोकड, 41 बेकायदेशीर इमारती आणि आरक्षित भूखंडावरील बोगस बांधकाम… IAS अनिलकुमार पवार प्रकरणाचा थरार

वसई – वसई–विरार महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम घोटाळ्याचा तपास अखेर मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक आणि माजी महापालिका आयुक्त IAS अनिलकुमार पवार यांना ईडीने बुधवारी उशिरा रात्री अटक केली.

पवार यांच्यासोबत नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता यांनाही ताब्यात घेण्यात आले.

आज सर्व आरोपींना पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे.

29 जुलै रोजी ईडीने मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा येथे एकाचवेळी 12 ठिकाणी छापेमारी केली होती.

या कारवाईत नाशिक येथील पुतण्याच्या घरी तब्बल 1 कोटी 33 लाखांची रोकड, नातेवाइकांच्या नावावरची बेनामी मालमत्तेची कागदपत्रं, बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.

तपासात पवार यांनी बांधकाम परवानग्यांसाठी प्रति चौरस फूट 20-25 रुपये लाच घेतल्याचं समोर आलं.

तर वाय. एस. रेड्डी यांनी नगररचना मंजुरीसाठी प्रति चौरस फूट 10 रुपये कमिशन घेतल्याचा आरोप आहे.

ईडीच्या तपासानुसार 2009 पासून वसई–विरार हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक इमारती उभ्या करण्यात आल्या.

41 बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात पवार आणि इतर आरोपींची भूमिका संशयास्पद असल्याचं निष्पन्न झालं.

या घोटाळ्यामुळे सुमारे अडीच हजार कुटुंबं बेघर झाली. एवढंच नव्हे तर नालासोपारा (पूर्व) येथील आरक्षित भूखंडावर,

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा डेपोसाठी राखीव असलेल्या जमिनीवर इमारती उभारण्यात आल्या.

बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका विकून सर्वसामान्यांची

फसवणूक करण्यात आल्याचंही उघड झालं. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अलीकडेच या इमारती पाडण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या घोटाळ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पवार यांनी बदलीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती.

मात्र ईडीच्या कसून तपासानंतर अखेर अटकेची कारवाई झाली.

पवार हे शिंदे सरकारच्या काळात ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि वसई–विरार आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्यांना ‘राजकीय पाठबळ’ असल्याच्या चर्चा अधिकच गडद झाल्या आहेत.

आता या प्रकरणातील पुढील चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/dhavatya-railweetun-padun-tarunacha-mitu-okh-patvinyache-condition/