४०% अनुदानित शिक्षक थेट १००% शाळेत!

कारंजा शिक्षण विभागातील समायोजन घोटाळा उघड

कारंजा (लाड) : शिक्षण प्रशासनातील नियमबाह्य कारभाराचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, कारंजा येथील समायोजन घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. शहीद अशफाकउल्ला खान उर्दू हायस्कूलमधील तीन शिक्षकांना (मोहम्मद नईम मोहम्मद शफी, मोहम्मद अन्सार मोहम्मद इब्राहिम आणि मोहम्मद आकिब मोहम्मद अय्यूब) तात्पुरते समायोजन म्हणून नगर परिषद उर्दू हायस्कूल, कारंजा येथे हलविण्यात आले होते. मात्र या शिक्षकांनी संगनमत करून आपली आस्थापना कायमस्वरूपी नगरपरिषद शाळेत बदलून घेतली आणि थेट १००% अनुदानाचा लाभ घेण्यास सुरुवात केली.शासन निर्णय दिनांक १२ डिसेंबर २०२२ आणि १५ मार्च २०२४ नुसार समायोजन हे तात्पुरतेच राहते, पगार मूळ शाळेवरूनच दिला जातो, तसेच मूळ शाळेत जागा उपलब्ध झाल्यास शिक्षकांना परत पाठवणे बंधनकारक आहे. परंतु या प्रकरणात नियमांचे उल्लंघन करून मूळ शाळेत जागा उपलब्ध असूनही शिक्षकांना परत पाठविण्यात आले नाही. उलट, पटसंख्या कमी दाखवून त्यांना कायम ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार जमील शेकुवाले यांनी केला आहे.

तक्रार आणि चौकशीची मागणी

या प्रकरणामुळे शाळांचे अनुदान, आस्थापना आणि विद्यार्थ्यांचे हित धोक्यात आल्याचे नमूद करत शेकुवाले यांनी सखोल चौकशीची मागणी केली असून, “दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबू” असा इशारा दिला आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया

या प्रकरणावर बोलताना कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले, “शिक्षण विभागासंदर्भातील तक्रारींची नोंद झाली आहे. यासाठी लवकरच त्रिसदस्यीय समिती नेमली जाणार असून, अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होईल.”

नियमांचा भंग 

  • ४०% अनुदानित शाळेतून १००% शाळेत समायोजन तात्पुरते असते

  • मूळ शाळेत जागा उपलब्ध झाल्यावर शिक्षकांना परत पाठवणे आवश्यक

  • शासन निर्णय १२ डिसेंबर २०२२ व १५ मार्च २०२४ चे स्पष्ट उल्लंघन

read also :https://ajinkyabharat.com/shetkyanana-saraskat-madatchan-assurance/