Ajit Pawar Last Rites: परत या परत या… महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिवावर आज बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघातातील त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, लाखो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावर तीन ते चार दशके गारूड निर्माण करणारे नेता होते. त्यांना आज अखेरचा निरोप देण्यासाठी रुग्णालयातून निघालेली अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. कार्यकर्त्यांनी “अजितदादा, परत या… परत या…” असे टाहो फोडले, अनेकजण धायमोकलून रडत होते. संपूर्ण आसमंत शोक लहरांनी भरलेले होते, आणि बारामतीतील जमाव हे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सुन्न झाले होते.
अजितदादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले. विधीवत मंत्रोच्चारानंतर त्यांना शासकीय सलामी देण्यात आली. त्यानंतर थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिली. या वेळी उपस्थितांचे काळीज हलले आणि अनेकांचे बांध फुटले. कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच भावना होती – दादांचा पर्व संपल्याने सर्वच हतबल झाले होते.
विमान कोसळलं, अखेरच्या क्षणी काय घडलं? अजितदादांच्या मृत्यूमागचा रहस्य!
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. पहाटेपासूनच राज्याच्या कोनाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती. “अजितदादा अमर रहे”, “महाराष्ट्राचा वाघ आला” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रशासनाने गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त तैनात केला होता.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि विविध पक्षांचे दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. उपस्थित नेत्यांना आपल्या अश्रू अनावर झाले, संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक होते.
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. बारामतीसह ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आले. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आपल्या कार्यसम्राट नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
विमान अपघात बुधवारी सकाळी ८:४५ च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे येत असताना झाला. चार्टर्ड विमान बारामती धावपट्टीजवळ कोसळले, खाली पडताच विमानाने पेट घेतला आणि ३–४ मोठे स्फोट झाले. या अपघातात अजित पवारांसह त्यांचे अंगरक्षक, सहाय्यक आणि दोन पायलट यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
अकस्मात अपघात, राज्य हादरले… अजित पवारांच्या अंतिम श्वासांची कहाणी
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात झालेल्या अंतिम संस्काराला उपस्थित लाखो कार्यकर्ते, नागरिक आणि राज्यातील नेते हळहळ व्यक्त करत, अश्रू अनावर आणि हुंदके घालत होते. प्रत्येकजण आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देताना भावनिक अवस्थेत दिसत होता. त्यांच्या कार्याची, सहकार्याची आणि समाजसेवेची आठवण उपस्थितांमध्ये ताजेतवाने होती. अजित पवार यांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला, राजकारणाचा घटक नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर खोल परिणाम झाला आहे, राज्यातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिक शोकाकुल झाले आहेत.
