शेतकऱ्याने पिकवावे, प्रक्रिया करावी आणि स्वतःच विकावे
एकात्मिक शेतीचा ‘कानमंत्र’; उमरखेडमध्ये भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण
केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता काळानुरूप बदल स्वीकारणे ही आजच्या शेतकऱ्यांची गरज आहे. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता प्रक्रिया करणारे व बाजारपेठ निर्माण करणारे उद्योजक व्हावे. ज्या दिवशी शेतकरी स्वतःच्या मालाचा दर स्वतः ठरवेल, त्या दिवशी त्याची खरी आर्थिक उन्नती होईल, असा मोलाचा ‘कानमंत्र’ अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिला.
ते उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित **‘सहकारमहर्षी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. लोकनेते स्व. भाऊसाहेब माने यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. १ फेब्रुवारी) हा भव्य आणि देखणा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
एकात्मिक शेती हाच शाश्वत मार्ग
शेतकऱ्यांसाठी आपल्या भाषणात डॉ. शरद गडाख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजची शेती केवळ पिकांपुरती मर्यादित न ठेवता पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्री यांचा समन्वय साधणारी असली पाहिजे.
“एकात्मिक शेती पद्धतीमुळे जोखीम कमी होते, उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतात आणि शेतकऱ्याचा नफा वाढतो,” असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी हा केवळ कष्ट करणारा नसून तो अनुभवातून नवनवीन प्रयोग करणारा खरा संशोधक आहे. त्याच्या ज्ञानावर आणि अनुभवावर त्याचा ठाम विश्वास असतो. महाराष्ट्रातील नामवंत शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि उद्योजक एकत्र येऊन विचारमंथन करतात, ही बाब इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय पं. माने होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून
खासदार नागेश पाटील आष्टीकर,
आमदार किसनराव वानखेडे,
रोजगार हमी योजनेचे आयुक्त भारत बाष्टेवाड (नागपूर),
माजी रेशीम संचालक कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री,
भाजप पूर्व विदर्भ समन्वयक नितीन भुतडा,
संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर,
गणेश शिंदे,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव वानखेडे,
शिवराम धोडके,
जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे,
उपविभागीय कृषी अधिकारी विजय मोकाडे,
माजी आमदार विजय खडसे,
माजी आमदार नामदेव ससाणे,
काँग्रेस नेते तातू देशमुख,
राम देवसरकर,
कल्याणराव माने,
ए. के. मिश्रा,
कृषी शास्त्रज्ञ डॉ. नितीन कोष्टी,
वासुदेव चांदुरकर, बाबूराव पाथ्रडकर, वसंत फुके,
श्रीकांत अमरशेट्टीवार,
डॉ. संदीप कदम, डॉ. मयूर ढोले,
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चिंतले
यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२६ कर्तृत्ववानांचा गौरव
शेतकऱ्यांसाठी या सोहळ्यात शेती, कृषी संशोधन, प्रक्रिया उद्योग, उद्योजकता आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्कार
रेशीम उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल नागपूर येथील डॉ. महेंद्र ढवळे यांना मानाचा
‘सत्यशोधक भाऊसाहेब माने कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कृषी पर्यटन, प्रक्रिया उद्योग आणि नवोपक्रमांचा सन्मान
या वेळी खालील मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
कृषी पर्यटनाचे प्रणेते पांडुरंग तावरे (बारामती)
पांडुरंग आवाड (धाराशीव)
कृष्णकुमार राठी (अकोला)
दिशा उदगीरकर (अकोला)
अंकिता मोरे पाटील (जालना)
रवींद्र मेटकर (अमरावती)
बाबाजी बांगर, अजिंक्य कांबळे (पुणे)
गोविंद पवार (नांदेड)
श्रीपत राठोड (नागपूर)
कृष्णराव देशेट्टीवार (यवतमाळ)
पूजा जिनेवाड-संगणवार (घाटंजी)
संतोष देशमुख, सुरेंद्र नारखेडे (अकोला)
मिलिंद देशमुख (राहुरी)
डॉ. मनोज माळी (सांगली)
डॉ. एन. एम. कोंडे, डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. किशोर बिडवे (अकोला)
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन पुरस्कार
उमरखेड तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ‘आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये
खरबी – वंदन पांडे,
सुकळी – दत्ता वानखेडे,
पोफाळी – सतीश जामकर,
खरूस – समाधान वानखेडे
यांचा समावेश होता.
अनुभवांचे आदानप्रदान : शेतकरी मंत्रमुग्ध
हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि विचारांची देवाणघेवाण ठरला. रेशीम संचालक डॉ. महेंद्र ढवळे, पांडुरंग तावरे, पांडुरंग आवाड, सुरेंद्र नारखेडे, दिशा उदगीरकर, श्रीपत राठोड, अंकिता मोरे, रवींद्र मेटकर आणि कृष्णकुमार राठी यांनी आपल्या संघर्षातून मिळवलेले यश, अपयशातून घेतलेले धडे आणि प्रक्रिया उद्योगातील अनुभव मांडले. या अनुभवकथनाने उपस्थित शेतकरी भारावून गेले होते.
प्रसार माध्यम प्रतिनिधींचा गौरव
शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या आणि यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पश्चिम विदर्भातील अग्रगण्य दैनिक ‘अजिंक्य भारत’ (मुंबई) चे संपादक सुगत वाघमारे आणि दैनिक ‘सकाळ’ (छत्रपती संभाजीनगर) चे उपसंपादक संतोष मुंडे यांना
‘कृषी प्रसार व पत्रकारिता गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
आयोजन आणि सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी प्रभावीपणे केले, तर उद्धव गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
शेतकरी आपल्या ज्ञानावर ठाम असतो
“शेतकरी हा केवळ राबणारा नसून अनुभवाच्या आधारे नवनवीन प्रयोग करणारा संशोधक आहे. त्याने आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानावर त्याचा ठाम विश्वास असतो.” डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
२५ वर्षांची परंपरा
“स्व. भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या २५ वर्षांपासून हा कृषी सोहळा अविरत सुरू आहे. ‘ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून शेतीतील नवे संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे.” डॉ. विजय पं. माने, सहयोगी अधिष्ठाता, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ
