2003 चा कठीण काळ

आईच्या कुशीत रडत अनुभवले भय

अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाबद्दल मोकळेपणाने व्यक्त केले. 2003 मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेनंतर त्याच्या जीवनावर आणि करिअरवर मोठा परिणाम झाला होता. त्या वेळेस विवेक अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करत होता आणि त्या आधी ऐश्वर्या आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. विवेकने पत्रकार परिषदेत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते आणि धमकावल्याची माहिती दिली होती. मुलाखतीत विवेकने सांगितले की, त्या काळात त्याच्या कुटुंबीयांनाही धमक्यांचे कॉल्स आणि मेसेजेस येत होते. “त्या वेळेस माझ्या बहिणीला, आईला, वडिलांना धमक्या येत होत्या. माझं खासगी आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. मी नैराश्यात होतो. मी आईच्या कुशीत जाऊन खूप रडलो. मीच का, असा प्रश्न मी तिच्यासमोर केला. तेव्हा ती म्हणाली, जेव्हा तू पुरस्कार जिंकलास, चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवली, चाहते तुला फॉलो करत होते, तेव्हा तू हा प्रश्न विचारलास का? मग आताही विचार करू नको,” असं विवेकने सांगितलं. त्याने पुढे सांगितलं की, “मला लक्षात नाही किंवा पर्वा नाही की माझ्यासोबत काय घडलं होतं. मात्र ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत, त्या म्हणजे माझ्या आईच्या चेहऱ्यावरील काळजी आणि वडिलांच्या चेहऱ्यावरील चिंता. मी त्या सर्व आठवणींना दूर सोडून पुढे आलोय. कारण त्या आठवणींतून नकारात्मक भावनांचा जन्म होतो.” विवेकने सांगितले की, त्या काळात त्याच्यासाठी कोणीही काम करण्यास तयार नव्हते, अगोदर साइन केलेल्या चित्रपटातूनही बाहेर काढण्यात आले. “त्यावेळी प्रत्येकजण मला नाकारत होता,” असं तो म्हणाला. या संघर्षातून त्याने मानसिक आणि भावनिक धैर्य मिळवलं आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तो पुन्हा करिअरमध्ये सामोरं येऊ शकला. या मुलाखतीत विवेकने आपल्या आयुष्यातील त्या कटू आठवणींचा उलगडा करून मानसिक आरोग्य आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/kalavishvar-hai/