जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा
आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करा
– जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १८ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून कार्यवाही करावी.
आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्याचे आढळताच वस्तुस्थिती तपासून निष्पक्षपणे कारवाई करावी.
Related News
नागरिकांमध्ये यंत्रणेबाबत विश्वासार्हता वृद्धिंगत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
नागपूर येथील सामाजिक तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सर्व यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांनी घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने,
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस
अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नागपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये
यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. विविध मागण्यांची निवेदने देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होतात.
अशा ठिकाणी खबरदारी घ्यावी. स्थानिक स्तरावर मोर्चे, आंदोलनांना परवानगी देताना मुंबई पोलीस अधिनियमाद्वारे लागू आदेशांचे पालन होईल याची खातरजमा करावी.
आवश्यक तिथे कठोर उपाययोजना राबवाव्यात. कोणत्याही धार्मिक स्थळांलगतच्या रस्त्यांवरून आंदोलन, मोर्चे काढू नये.
पुढील काळात सण-उत्सव शांततेत पार पडतील याची दक्षता घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्तरावर कुठेही अनुचित प्रकार घडत असेल किंवा तसे घडण्याची शक्यता आढळल्यास त्याचवेळी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे.
सायबर पोलीस सेलकडून समाजमाध्यमांचे संनियंत्रण केले जाते. त्यासोबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार स्तरावरही संनियंत्रण व्हावे.
माध्यमांना आवश्यक वस्तुनिष्ठ माहिती मिळेल याची दक्षता घ्यावी व संपर्कात राहून माहितीचे आदानप्रदान करावे.
गावपातळीवरही चुकीचे संदेश प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अधिका-यांनी या कालावधीत मुख्यालय सोडू नये.
विनापरवानगी रजा कुणीही घेऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात रात्रीचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता ‘महावितरण’ने घ्यावी, तसेच सण-उत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे
आदी बाबी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सणाचे औचित्य संपल्यानंतर तत्काळ हटवाव्यात.
आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस अधिक्षक श्री. सिंह म्हणाले की, सोशल मीडिया सेलद्वारे प्रसारित मजकुराचे संनियंत्रण होते.
तथापि, सर्व यंत्रणांनीही आपल्या निदर्शनास आलेल्या बाबी तत्काळ कळवाव्यात. सर्व यंत्रणांमध्ये सतत संपर्क व समन्वय ठेवावा.
गावपातळीवरील यंत्रणेपर्यंतही याबाबतच्या सूचना तत्काळ प्रसारित केल्या जातील,
असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी सांगितले..