मनभा- कारंजा तालुक्यातील मनभा ते दोनद या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
या रस्त्यावरून दररोज शासकीय कामकाज, शेतीसाठी जाणारे शेतकरी, दवाखान्यासाठी जाणारे रुग्ण तसेच शिक्षणासाठी जाणारे अनेक विद्यार्थी प्रवास करतात. पण रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. आतापर्यंत अनेक वाहनधारक व प्रवासी अपघातग्रस्त झाले असून, नागरिकांच्या नाराजीला ऊत आला आहे.
२४ तास वाहतूक सुरू असलेल्या या मार्गावर लालपरीसह इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक ठरत आहे. विशेषतः रुग्णवाहिकांना रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे कठीण होत असल्याने जीव धोक्यात येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, “या मार्गाचे खोलीकरण करून डांबरीकरण तातडीने करण्यात यावे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
एकूणच, मनभा–दोनद मार्गावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवले नाहीत, तर यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.