जयपूर : नवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 दिवसांचा उपवास सुरू ठेवला असला तरी त्यांच्या कामाच्या गतीत कोणतीही मंदी नाही. गुरुवारी (25 सप्टेंबर) त्यांनी विविध ठिकाणी विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन करत व्यस्त दौरा पूर्ण केला.दिवसाची सुरुवात ग्रेटर नोएडा येथून झाली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 चे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध उद्योगांतील उद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांबद्दल माहिती घेतली.यानंतर ते थेट राजस्थानमधील बांसवाडा येथे दाखल झाले. येथे त्यांच्या हस्ते तब्बल 12,210 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन पार पडलं. या प्रकल्पांमध्ये ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे.यावेळी पंतप्रधान मोदींनी पीएम-कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. बांसवाडा येथे काही लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील लाभार्थी ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले. या संवादादरम्यान लाभार्थ्यांनी सांगितले की, कुसुम योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास मिळाला आहे.कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे आणि योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचतो आहे, हे पाहून समाधान वाटते.”राजस्थान दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना झाले आणि तेथे त्यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 या उपक्रमात सहभाग घेतला. या परिषदेत त्यांनी अन्न प्रक्रिया व कृषी-व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून जागतिक अन्न सुरक्षेत भारताची भूमिका अधोरेखित केली.नवरात्रीतील उपवासाच्या काळातही पंतप्रधान मोदींचा उत्साह आणि कार्यतत्परता कायम दिसून आली. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजस्थानातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/beed-crime-news/
