||देह वेचावा कारणीं|

||देह वेचावा कारणीं|

आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.

Related News

यामुळे नवीन पिढी आळशी बनली. त्यांच्यात नितिशुन्यता आली.

परावलंबी जीवन जगण्यातच त्यांना धन्यता वाटते.

अशा स्वाभिमानशून्य लोकांवर संत तुकाराम टिका करतात.

त्यांनी आपल्या अभंगातून समाजात नवचैतन्य,

आत्मविश्वास, स्वावलंबीत्व निर्माण करण्याचे काम केले.

सामाजिक व्यवहारात आचार, विचार, नीतिमूल्यांची रुजवणूक केली.

त्यासाठी कर्मवादाचा सिद्धांत सांगितला.

तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया। तोंवरी कासया स्फुंदा तुम्ही ।।४।। अ.क्र. १७२६

समाजात समता, बंधुत्व, नीती या मूल्यांची रूजवणूक त्यांनी केली.

लोकांना सदाचारी बनण्याचा सल्ला ते देतात.

आजही वारकरी संप्रदायातील लोक भक्ती मार्गाने सामाजिक स्थिती बदलण्याचा कसोसीने प्रयत्न करित आहेत.

समाजाच्या कल्याणाकरिता प्रत्येक नागरिक चारित्र्यसंपन्न असावा अशी संत तुकारामांची धारणा होती.

माणसातील माणूसपण जागे करण्यासाठी त्यांनी सामाजिक क्रांती केली.

समाजातील विषमता, व्यभिचार, दुष्कृत्य या समाजिक वैगुंण्याची तुकारामांना चीड होती.

त्यांनी आपल्या अभंगातून दुभंगलेल्या समाजाला एकत्र आणण्याचे काम केले.

त्यासाठी प्रसंगी कठोर शब्दांचा वापर केला.

समाजाला नीती, धर्म, आचार-विचारांची शिकवण दिली.

त्यांच्यात वैश्विकतेची भावना निर्माण केली.

त्यांनी मानवतेचा व समतेचा प्रचार केला.

समाजाला अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.

त्यांनी चिरंतन शाश्वत मूल्यांची प्रेरणा दिली.

रूढीग्रस्त समाजाला वर काढण्याचा प्रयत्न तुकारामांनी केला.

संत तुकारामांच्या अभंगांनी आत्मोध्दाराबरोबर लोकोद्धार केला.

संत तुकारामांचे काव्य जीवनमूल्यांची तिजोरी आहेत.

त्यांच्या अभंगातून विनम्रता, सचोटी, कृतज्ञता व्यक्त होते.

तत्वज्ञान, कवित्त्व, संततत्त्व, योगीतत्त्व अशी विविधता त्यांच्या अभगातून स्पष्ट होते.

समाजातील अंतःकरणाला स्पर्श करणारी कविता तुकारामांची आहे.

नीतीशिक्षणाचे धडे देतांना ते म्हणतात-

सांगतों ते नीतीचे संकेत। सावधान हित व्हावे तरी ।। अ.क्र. २७४
संत तुकारामांनी दिलेली शिकवण लोकमानसात रुजवणे महत्वाचे आहे.

त्याच्या अभंगांचा प्रभाव सामान्यांवर, अभ्यासकांवर पडतो.

जीव, देह, चित्त, मानवी इंद्रिय यांना नितीने चालण्याचे वळण लावण्यास संत तुकाराम सांगतात.

नैतिकतेतून आत्मशुद्धी होते. त्यामुळे मानवी जीवनातील अंधकार नाहिसा होतो.

प्रयत्नवादाला चालना मिळते.

अध्यात्मातून निष्कामकर्मवादाची रूजवणूक करणारे तुकाराम एक महान संत आहेत.

त्यांच्या विचाराने लोकजागृती घडवली आहे.

त्यामुळे समाज संघटीत होण्यास मदत होते.

समाजात वैचारीक क्रांती घडवण्याचे काम तुकोबांनी हाती घेतले होते.

ते काम त्यांनी अभंगकाव्यातून पूर्ण केले.

शुध्दबीजा पोटी। फळे रसाळ गोमटीं।।१।।

मुखी अमृताची वाणी। देह वेचावा कारणीं।। २ ।।

सर्वांगी निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।। ३ ।।

तुका म्हणे जाती। ताप दर्शनें विश्रांती ।।४।। अ.क्र. ६२

संत तुकाराम आपल्या अभंगात वेद, उपनिषदे याचे रसाळ वर्णन करतात.

त्यांच्या अभांगांनी जनमानसात जागृती घडवण्याचे कार्य कीर्तनातून सुरू आहे.

संत तुकाराम समाजसुधारक, लोकशिक्षक, धर्मोपदेशक होते.

त्यांनी विष्णुमय जग बनविण्याचे कार्य आपल्या अभंगांतून आणि कीर्तनातून अखंडपणे केले.

सामाजिक दोषांवर, दंभावर, ढोंगबाजीवर त्यांनी कडाडून टीका केली.

मानवतावादी संस्कृतीचा प्रसार, प्रचार त्यांनी केला.

सामान्य जनतेला प्रयत्नाचे महत्व पटवून दिले.

पशु ऐसे होती ज्ञानी। चर्वणीं या विषयांचे ।।१।।

ठेवूनियां लोभीं लोभ। झाला क्षोभ आत्मत्वीं ।

केला आणिकां वाढी पाक। खाणें ताक मूर्खासी ।। २ ।।

तुका म्हणे मोठा घात। वाताहात हा देह।।३।। अ.क्र. १४२९

समाजातील समाजकंटकांना ठिकाणावर आणण्याचे काम तुकारामांनी केले.

कर्तव्यपराङ्मुख लोकांना कर्तव्यपरायण बनवण्याचे काम केले.

समाजामध्ये उत्साह भरण्याचे काम त्यांनी केला.

अशिक्षित समाजाला, बोली भाषेत, व्यवहारातून पारमार्थिक जीवन जगायला शिकवले.

तुकारामांच्या लौकिक, पारमार्थिक व वाङ्मयीन जीवनात फारसा फरक दिसून येत नाही.

तुकारामांची अभंग रचनाच त्यांचे संपूर्ण जीवनचित्रण आहे.

आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें।

संत तुकाराम एक उर्जास्त्रोत आहेत.

त्यांनी सर्वसामान्यांना आपल्या अभंगवाणीने आपलेसे केले.

तुकारामांची अभंगवाणी अंतरंगातील भावविश्वातील अनुभव प्रकट करणारी आहे.

त्यांनी समाजाला जगण्याची दिशा दिली. समाजाला कार्यप्रवण केले.

संत तुकारामांच्या अभंगांची भूमिका फार महत्वाची आहे.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेले कर्म प्रामाणिकपणे केले तर आदर्श समाज निर्माण होतो.

आदर्श समाजव्यवस्थेत कोणत्याही समस्या शिल्लक राहात नाहीत.

भारताला विश्वगुरू स्थानावर नेण्यासाठी सर्वांना आपला वाटा उत्स्फुर्तपणे उचलावा लागणार आहे.

✍️प्रशांत घुगे अकोला

Related News