भारताने पाकिस्तानला लोळवले टीम
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
इंडियाचा 7 विकेट्स आणि 25 चेंडू राखून विजय
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सूर्यकुमार यादव (नाबाद ४७), तिलक वर्मा (३१) आणि अभिषेक शर्मा (३१) यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने १२८ धावांचे लक्ष्य सहज गाठले.
भारतीय संघ असा जिंकला
पाकिस्तानकडून सईम अयुब (०), मोहम्मद हारिस (३), फखर झमान (१७) आणि सलमान आगा (३) स्वस्तात बाद झाले. एकामागोमाग एक विकेट पडत असताना, साहिबजादा फरहानने ४४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीने १६ चेंडूत नाबाद ३३ धावा करत धावसंख्येत भर घातली. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले.
शुभमन गिल (१०) लवकर बाद झाला तरी, अभिषेकने वेगवान खेळी केली. त्यानंतर तिलक आणि सूर्यकुमारने डाव सांभाळला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. तिलक बाद झाल्यानंतर सूर्याने शिवम दुबेच्या साथीने यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
हार्दिकची खास कामगिरी
भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सलामी फलंदाज सईम अयुब (०) याला जसप्रीत बुमराहच्या हाती झेलबाद केले. पहिल्या चेंडूवर बळी घेणारा तो आता दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अर्शदीप सिंगने असा पराक्रम केला होता. गेल्या वर्षी त्याने अमेरिकेविरुद्ध शायन जहांगीरचा बळी घेतला होता. पंड्याने या सामन्यात १ बळी घेण्यासाठी ३४ धावा दिल्या.
कुलदीपने घेतले ३ बळी
पाकिस्तानच्या डावाच्या ७ व्या षटकात आणि आपल्या पहिल्याच षटकात कुलदीपने अत्यंत किफायती गोलंदाजी करत केवळ २ धावा दिल्या. त्यानंतर, त्याने आपल्या दुसऱ्या षटकात अनुक्रमे हसन नवाज (५) आणि मोहम्मद नवाज (०) या दोघांना चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर बाद केले. या चायनामॅन गोलंदाजाने आपल्या चौथ्या षटकात साहिबजादा फरहानला (४०) तंबूत पाठवले. त्याने ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले
कुलदीप सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
आशिया चषक २०२५ च्या आपल्या पहिल्या सामन्यात यूएई क्रिकेट संघाविरुद्ध कुलदीपने ७ धावा देत ४ बळी घेतले होते. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २ सामन्यांत ७ बळी घेतले आहेत. या कामगिरीमुळे तो सध्या या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. आज कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला, ज्यात त्याने प्रभार्व कामगिरी केली आहे.
अभिषेकची धडाकेबाज फलंदाजी
भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या अभिषेकने पहिल्याच चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने पॉवरप्ले षटकांचा पूर्ण फायन घेत केवळ १३ चेंडूत ३१ धावा केल्या. आपल्या या छोट्या पण वेगवान खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तो साय अयुबच्या गोलंदाजीवर बाद झाला. आपल्या पहिल्या सामन्यात अभिषेकने ३० धावा केल्या होत्या. एकंदरीत भारताने पाकिस्तानवर मिळविला हा विजय या आशिया चषक कप साठी महत्त्वाचा ठरला असून भारतात सर्वत्र क्रीडा प्रेमीनीं एकच जल्लोष केला आहे